*पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील ८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह *

पुणे: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची पत्नी, मुलगी, आई यांना करोनाची लागण झाली असून घरातील लहान मुलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मोहोळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता यांच्या संपर्कात आले होते. ___ महापौर मुरलीधर मोहोळ यांना तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची करोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांतील १८ जणांची टेस्ट करण्यात आली. त्याचे रिपोर्ट आज आले असता घरातील एकूण ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. मोहोळ यांची पत्नी, मुलगी आणि आई यांना करोनाची लागण झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. तर घरातील लहान मुलांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. करोनाची लागण झालेल्या ८ जणांमध्ये मोहोळ यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. अजून १० जणांचे रिपोर्ट यायचे बाकी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.