पुण्यात दोन वर्षांचा चिमुरडा नाल्यात वाहून गेला, बीडच्या कुुटुंबावर दुःखाचा डोंगर नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे काही क्षणातच दोन वर्षांचा संस्कार साबळे नाल्यात दिसेनासा झाला.

पुणे : पुण्यातील सिंहगड परिसरात घराबाहेर खेळणारा दोन वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याची घटना (Pune Boy Missing in Drain) समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी कालपासून मुलापासून मुलाची शोधमोहीम हाती घेतली आहे, मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.


बीडहून सूर्यकांत साबळे काही कामानिमित्त पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा संस्कार यांच्यासोबत पुण्यात आले होते. गेल्या काही महिन्यापासून साबळे कुटुंब सिंहगड रोडवरील रक्षालेखा सोसायटीच्या परिसरात राहत होतं.


चिमुरडा संस्कार काल संध्याकाळी (बुधवार 12 फेब्रुवारी) साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत होतो. खेळता-खेळता तो नाल्यामध्ये पडला. नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे काही क्षणातच तो दिसेनासा झाला.


नाल्यात राडारोडा आणि आजूबाजूला झाडे पडली असल्याने शोधकार्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे काल रात्री शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज (गुरुवारी) सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.


मुलाचा शोध सुरु असल्याचं अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सकाळपासून अग्निशमनच्या दोन गाड्या आणि एक रेस्क्यू व्हॅनच्या साह्याने शोध सुरु आहे.