गरजेच्या वस्तू आणून ठेवा, रोज बाहेर पडू नका : आयुक्त शेखर गायकवाड

पुणे : पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दररोज घराबहर पडू नये. दैनदिन गरजेच्या वस्तू ५ दिवसांच्या एकदम आणून ठेवा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. नागरिकांनी सहकार्य ठेवून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही सध्या शहरातील १५ पैकी १३ वार्डमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. तर २ वॉर्डमध्ये अतिशय कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यांच्यापैकी ५ ते ६ जण कुठेही बाहेर पडलेले नाहीत. मनापासून त्यांनी नियंत्रण ठेवले. मात्र, घरातील १ व्यक्ती बाहेर भाजी घेण्यासाठी, विक्रीसाठी बाहेर गेला. किंवा समाजात मिसळला. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. एकदम ५ दिवसांच्या गरजेच्या वस्तू एकत्र आणून ठेवा. त्यामुळे रोजच्या रोज बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. तसेच कोरोनाची रिस्कही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.