राज्यपाल योग्य निर्णय घेतील, अन्यथा... - भुजबळ

मुंबई : राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दसरा एक पर्याय सुचवला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. या संवादादरम्यान भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेवरील नियुक्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांची नियुक्ती राज्यपालांनी करायला हवी, असं आम्हाला वाटतं. कारण तसा ठरावं मंत्रिमंडळानं केला आहे. मंत्रिमंडळानं केलेल्या ठरावावर राज्यपालांनी कार्यवाही करणं बंधनकारक आहे. अन्यथा दुसऱ्या पर्यायानुसार परत सगळं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि आपलं काम सुरू करेलं. पण, ही वेळ येऊ नये म्हणून राज्यपालांनी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं, अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.