नवी दिल्लीः करोना व्हारसमुळे देशातील लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गरीबांच्या मदतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढचे तीन महिने गरीबांना ५ किलो मोफत धान्य देण्यात येणार आहे. या योजनेनुसार आतापर्यंत विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना २२ लाख मेट्रीक टन धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलीय. __ गृहमंत्रालाच्या नियंत्रण कक्षातून आत्यावश्यक सेवा आणि वस्तुंच्या पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हेल्पलाइनद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येत आहेत. मंत्रालय आणि राज्य सरकारांच्या मदतीने आतापर्यंत ५ हजार समस्या सोडवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरीत मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने देशभरात २० केंद्र स्थापन केली आहेत. मुख्य कामगार आयुक्तांच्या देखरेखीत या केंद्रांचे काम सुरू आहे. पीडित मजुरांना वेळेवर मदत देण्याचा प्रयत्न या केंद्रांच्या माध्यमातून केला जात आहे. तसंच मदतीसाठी कामगार आणि रोजागर मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ई-मेल आयडीही देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिव पी.एस. श्रीवास्तव यांनी दिली.
पुढचे तीन महिने गरीबांना ५ किलो मोफत धान्य : गृहमंत्रालय