उद्धव ठाकरेंचा पेच लवकरच सुटणार ?

मुंबई - कोरोनावरून राज्यात संवेदनशील परिस्थिती असताना महाराष्ट्रात राजकीय गरमागरमी अनुभवायला मिळतेय. याला कारण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरूनच्या चर्चा. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. त्यात काही तांत्रिक त्रुटी असल्याने पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या चमूने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार करण्याची विनंती केलीये. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी याबाबतीत राज्याचे अॅडव्होकेट जनरल आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे विचारणा करावी लागेल आणि सरकारचा हा प्रस्ताव निकषात बसतो की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो की काय अशा बातम्या समोर येताना पहिल्या मिळाल्या. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीला लवकरच मान्यता देणार असल्याचं सूत्रांकडून आता समोर येतंय. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण न होता हा उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. २८ मे पर्यंत उद्धव ठाकरे यांना आमदार होणं गरजेचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल फोन केला होता अशी माहिती मिळतेय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकलं नसलं तरीही लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदारकीची वाट मोकळी होणार अशी आता माहिती सूत्रांकडून मिळतेय.