देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एक पत्र..... खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे. लॉकडाऊन काळात शेतमाल खरेदीला केंद्र सरकारनं सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनं सुद्धा खरेदीची घोषणा केली असली, तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्यानं शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळं कापूस, तूर, चणा खरेदी केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. ___ फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. लॉकडाऊन हे करोनावर मात करण्याचे प्रभावी आणि एकमेव अस्त्र असले, तरी हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणेही आवश्यक आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या त्वरेने सोडविल्यास याला फार मोठा हातभार लागेल. खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आता मशागतीच्या कामांना सुद्धा प्रारंभ होत आहे. बी-बियाणे, खते इत्यादींसाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसा असणे जरूरी आहे. पैसा यायचा असेल तर शेतमालाची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. कापूस, तूर, चणा इत्यादींची खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.