दिवे गेले - 'मिस्ड कॉल' द्या किंवा 'एसएमएस' करा

मुंबई : वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व 'एसएमएस' अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२४१०७८५०० या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. मोबाईलवरून आलेल्या मिस्ड कॉलच्या आधारे ग्राहकांच्या वैयक्तिक लेजरवरून (कन्झुमर पर्सनल लेजर) संगणक प्रणालीद्वारे ग्राहक क्रमांकाचा शोध घेतला जाईल व तक्रार प्राप्त झाल्याचा 'एसएमएस' संबंधीत ग्राहकांना पाठविला जाईल. एकापेक्षा अधिक ग्राहक क्रमांकासाठी एकाच मोबाईल क्रमांकाची नोंदणी असल्यास संबंधीत मोबाईल क्रमांकावरील पहिल्या ग्राहक क्रमांकाबाबत तक्रार नोंदविण्यात येईल. 'एसएमएस'द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून 'एसएमएस'द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून NOPOWERspaceConsumer Number हा 'एसएमएस' महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.