मुंबई : 'राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची कार्यालयात उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. तसे आदेश सरकारनं काढावेत,' अशी महत्त्वपूर्ण सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. __ लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित झाल्यापासून जनतेमध्ये रोष वाढत चालला आहे. आर्थिक, कौटुंबिक समस्यांमुळं यात भर पडली आहे. हे किती काळ चालणार असा प्रश्न लोक विचारत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पवार यांनी लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर येण्यासाठी काय करायला हवे याबाबत आपले मत मांडले. वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध क्षेत्रातील उपाययोजनांबाबत काही सूचना सरकारला केल्या. 'करोना हा आजार इतक्या लवकर हद्दपार होणार नाही. त्यामुळे त्याला जीवनाचा एक भाग समजून, त्याच्यापासून सावध राहून, आरोग्य सांभाळण्याबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक आहे. जपानमध्ये संसर्ग नसतानाही लोक दैनंदिन जीवनात मास्क घालणे, वैयक्तिक स्वच्छता वगैरे पथ्ये पाळतात, ही बाब पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंत्री, अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलवा; लोकांचा विश्वास वाढेल : शरद पवार