एसआरए प्रकल्पांना गती मिळणार

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाकडून (एसआरए) सुधारित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सबळ करणाशिवाय रखडलेले प्रकल्प रद्द करणे, पुनर्वसनासाठी असलेली सत्तर टक्क्यांची अट शिथिल करणे, पुनर्वसनासाठी दोन्ही महापालिकांना विकसक म्हणून परवानगी देणे आदी धोरणांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात खाजगी, शासकीय तसेच निमशासकीय जमिनींवर जवळपास ५८० हून अधिक झोपडपट्टया आहेत. अरूंद रस्ते व दाटीवाटीने एकमेकांस जोडून बांधलेल्या एकमजली तसेच बहुमजली झोपडयांमुळे या ठिकाणी योग्य नागरी सुविधा पुरविणे देखील अशक्यप्राय व खर्चिक झाले आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत गांभिर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे. अत्यंत दाटवस्ती, बेताची आर्थिक परिस्थिती, अल्प शिक्षण, स्वच्छता व आरोग्य विषयाचे अज्ञान आणि छोट्या झोपडीत राहणारे ८ ते १० जणांचे कुटुंब अशा अनेक कारणांमुळे शहरातील झोपडपट्ट्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या उद्रेकाची प्रमुख ठिकाणे बनली आहेत.