मुंबई : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असतानाच, सरकारनं आज, नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबईत आता घरपोच दारू मिळणार आहे. मात्र, मद्याच्या दुकानांत खरेदी केली जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर राज्यात आता फक्त रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. मुंबई महापालिकेसह महानगर क्षेत्रातील सर्व महापालिका रेड झोनमध्ये असतील. हे सर्व नियम आता २२ मे पासून लागू होतील. __राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना, रेड झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत, असं सांगितलं होतं. तसंच ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज, राज्य सरकारनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन, अर्थात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील. उर्वरित जिल्हे नॉन रेड झोनमध्ये असणार आहेत.
राज्यात आता २ झोन; काय सुरू आणि काय बंद राहणार