घरकाम करणाऱ्या महिलांचा रोजगारच गेला
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र या काळात अनेक उद्योगधंदे, दुकानं बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत सरकारने करोनाचा प्रभाव कमी असलेल्या काही भागांमध्ये उद्योगधंदे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या लॉकडाउनचा फटका देशातील कामगारांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सोसायट्यांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांचाही रोजगार या लॉकडाउन काळात तुटला आहे. अनेक महिलांवर सध्या उपासमारीचे संकट ओढवले असून आता प्रपंचाचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न पडला आहे. कामावर येऊ का ? विचारल्यावर नाहीच सांगतात तर काहींना अजूनही निरोप न आल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. परंतु घरकाम करणाऱ्या ज्या महिला वर्षानुवर्षे काम करत आहेत अशांना काम करण्यास काही हरकत न घेतल्याने त्यांनी आपले काम सुरू केले आहे. मात्र ज्या महिला अजुनही कामाच्या अपेक्षेने थांबून आहेत त्यांचा संघर्ष काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. काही महिलांना तर मार्च महिन्यात केलेल्या कामाचे पैसेही मिळाले नाहीत. फोन केल्यावर फोन न उचलणे तसेच ऑनलाईन ट्रान्सफर करता येत नाहीत अशी फुटकळ कारणे या महिलांना सांगितली जात आहेत. आतापर्यंत ज्या घरात आपण काम केलं त्या घरातून पुन्हा फोन येईल अशी आशा या महिलांच्या मनात आहे. काही काम मिळावं या आशेने अनेक महिला परिसरातील सोसायट्यांच्या गेटबाहेर उभ्या असतात. अनेक घरांनी या महिलांचा पगारही थकवला आहे, त्यामुळे हक्काचे पैसे घेतल्याशिवाय आपण कुठेही जाणार नसल्याचं मत काही महिलांनी व्यक्त केलं. संकटाच्या या काळात काहींना चांगले अनुभव आले तर काहींना नेहमी गोड बोलणारे ७०० ते ८०० रूपयांसाठी चकराही मारायला लावणारे भेटले आहेत. परंतु काहींनी मात्र आवर्जुन फोन करून पैसे लागले तर हक्काने माग असे म्हणून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करत केले आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांचे नेते किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ते कुठे गेले आहेत. हेच समजत नाही. घरकाम करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या तथाकथित पुढाऱ्यांनी नको त्या विषयात डोके घालण्यापेक्षा घरकाम करणाऱ्या या महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असेच या निमित्ताने वाटते.