वुहान : सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. परंतु ज्या ठिकाणी करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या त्या चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून करोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा चीन करोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमधील वुहानमध्ये करोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. ३ एप्रिलनंतर या ठिकाणी एकाही व्यक्तीत करोनाची लक्षणं सापडल्याची माहिती समोर आली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा चीनमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. चीननं गुरूवारी सर्वच क्षेत्र कमी धोक्याची क्षेत्र असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर चीनच्या उत्तरपूर्व जिनिल प्रांतातील शुलान या शहरात रविवारी करोनाग्रस्त ११ रुग्ण आढळून आले. त्यापूर्वीही एका महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या घटनेनंतर चीननं शुलान या शहराला धोक्याचं क्षेत्र असलेल्या यादीत टाकलं आहे.
वुहानमध्ये पुन्हा करोनाचं आगमन