पुण्याची बाजारपेठ हळूहळू जोर धरतेय

पुणे : पुण्यातील दकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास प्रशासनाने सांगितले असले तरी व्यापारी अंदाज घेऊनच दुकाने उघडण्यास सुरूवात करीत आहेत. पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या बाजारपेठेतली दागिने, साड्या आणि ड्रेस मटेरिअलची दुकाने उघडली असून तुळशीबाग मात्र पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणेकरांना मात्र बऱ्याच गोष्टींना मुरड घालावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. रमत गमत शॉपिंग करणे, ग्रुपने शॉपिंग करणे या गोष्टी टाळाव्या लागणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे सुरक्षित अंतर ठेवून, मास्क घालावाच लागणार आहे. कारण, तुळशीबागेत व्यापाऱ्यांनी काळजी घेण्याचा निर्धार केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही बाजारपेठ आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात काही भागातील व्यवहार सुरू झाले आहे. दोन दिवसांपासून लक्ष्मी रस्त्यावर बाजारपेठ उघडली गेली. त्यामुळे या रस्त्यालगतच्या गणपती चौकाशेजारी तुळशीबागेतील दुकाने उघडणार, याची उत्सुकता आहे. मात्र, आणखी एका आठवडा दुकाने बंद राहणार आहेत. काही ठिकाणी कपड्यांची विशेषतः साड्यांची दुकाने सुरू झाली. परिणामी, शहरातील मुख्य बाजारपेठ अनेक दिवसांनी गजबजल्याचे चित्र होते. काही छोट्या दुकानदारांनीही व्यवसाय सुरू केला. त्याचवेळी लक्ष्मी रस्त्याच्या सदाशिव पेठ, नारायण पेठेतील सर्व सुरळीत झाल्याचे दिसून आले. टिळक रस्त्यावरची दुकाने गुरूवारी काही अंशी सुरू होती. शास्त्री रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ आहे.