बेळगाव - लॉकडाउनमुळे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गेम खेळण्यालाच पसंती दिली जात असल्याने अनेकांच्या मानसिकतेत बदल होत आहेत. यामुळे केवळ मोबाईल पाहण्यापेक्षा इतर खेळ किंवा पुस्तके वाचण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. लॉकडाउनकाळात मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. कँडीक्रश, स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, रेस, क्रिकेट वर्ल्ड, फुटबॉल, तीनपत्ती अशा गेम्सची चलती आहे. यासंबंधी मानसशास्त्रज्ञांशी चर्चा केली असता, त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचा इशारा दिला. सतत मोबाईलमध्ये राहिल्याने मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. लवकर उत्तेजित होणे, राग येणे, भावना अनावर होणे, चिडचिड वाढणे, मन एकाग्र न होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो असा इशारा मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे. __ लॉकडाउन काळात पालकांपेक्षा लहान मुले जास्त मोबाईल वापरताना दिसत आहेत. मोबाईलची इत्यंभूत माहिती लहान मुलांना आहे. त्यात एखाद्या दिवशी मोबाईल हाताळायला मिळाला नाही की, मुलांची चिडचिड वाढते. मोबाईल गेमचे हे वेड अभ्यासावरही परिणाम करणारे ठरत असल्याचे चित्र आहे.
मोबाईल हाताळताय पण सावधान !