पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मागील दोन महिन्यापासून संपूर्ण देशात तसेच आपल्या राज्यात लॉक डाऊन काळ सुरू आहे कोरोना विषाणू मुळे कोणत्याही सामान्य नागरिकाला आरोग्याचा धोका होऊ नये याकरिता प्रशासन, पोलीस प्रशासन कार्यरत आहेत. परंतु लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय, दुकाने, व्यापार, मोठ्या कंपन्या या बंद आहेत. त्यामुळे कामगार मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येऊ नये तसेच आपल्या गावातील कोणालाही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी पुण्यातील म्होकर ग्रुपने ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे. कामानिमित्त तसेच व्यवसायानिमित्त पुण्यात असलेले बरेच जण व्हॉटस्अप ग्रुपद्वारे एकमेकांच्या संपर्कात असतात आणि त्यातून सुनिल रा. म्होकर, भरत म्होकर, शिवाजी भा. मोकर, दिलीप गु. मोकर यांना ही कल्पना सुचली. त्यांनी त्वरीत व्हॉटस्अपद्वारेच सर्वांना आवाहन केले आणि पाहता पाहता बऱ्यापैकी रोख स्वरूपात रक्कम जमा झाली. काहींनी वस्तूच्या स्वरूपातही मदत केली. म्होकर परिवाराच्या या व्हॉटस्ग्रुपद्वारे जमा झालेल्या रोख स्वरूपाच्या मदतीतून अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तूंचे किट तयार करून त्याचे अहिरे येथील मोकरवाडी, खाडेवाडी, सोनारवाडी व वांजळेवाडी येथे नुकतेच वाटपही करण्यात आले. पुण्यातील म्होकर परिवाराने अडचणसमयी गरज ओळखून केलेल्या मदतीचे ग्रामस्थांनी कौतूक केले असून आभारही व्यक्त केले.
म्होकर परिवाराच्या वतीने अहिरे ग्रामस्थांना मदतीचा हात