शक्रवार दि. २२ मे रोजी भाजपचे आंदोलन

पुणे : कोरोना विषाणूमुळे पुणे शहरात निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य शासन आणि प्रशासनाला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्यातील स्थितीचे गांर्भीर्य विषद करताना मुळीक म्हणाले, 'ससून सर्वोपचार रूग्णालयात कालपर्यंत ४६९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच ससूनमध्ये दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, कर्नाटक या देशातील काही मोठ्या राज्यातील मृत झालेल्या व्यक्तिंच्या संख्येपेक्षा ससूनमधील मृतांची संख्या खूप मोठी आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.'