मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल संध्याकाळी तातडीची व महत्त्वाची बैठक झाल्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. ___ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. मात्र, पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडामोडी घडत असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली. त्यातच माजी मुख्यमंत्री व सध्या भाजपचे खासदार असलेले नारायण राणे यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यामुळं तर्कवितर्काना उधाण आलं. ___ या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी बैठक झाली. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे. तब्बल दीड तास ही चर्चा चालली. या बैठकीत करोनाच्या परिस्थितीबरोबरच केंद्र सरकारच्या संभाव्य भूमिकेवर चर्चा झाल्याचं कळतं.
पडद्यामागे काहीतरी घडतंय !