नक्की काय गोंधळ सुरू आहे ?

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदांची 'ड्रामेबाज' म्हणून केलेली संभावना सीतारामन यांना चांगलीच झोंबल्याचे आज जाणवले. आजच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सीतारामन यांनी राहल गांधी हेच ड्रामेबाज असल्याचा प्रत्यारोप केला. त्यामुळे नक्की ड्रामेबाज कोण, यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे. ___ लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. लॉकडाऊनमध्ये वाहनांची सोय होत नसल्याचा आरोप करीत अनेक स्थलांतरीत मजुरांनी आपल्या बायका-मुलांसाठी शेकडो-हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे पायी चालत जायला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. केंद्र शासनाकडून नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. दररोज पत्रकार परिषदा घेऊन नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. दररोज ड्रामेबाजी सुरू आहे, अशा अशयाची टीका केली होती. त्या टिकेविषयी सीतारामन यांना छेडले असता त्या चांगल्याच भडकल्या. राहुल गांधी यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, पंतप्रधानांनी आधीच सर्व स्थलांतरित मजुरांना आहात तिथे थांबवण्याचे आवाहन केले होते. केंद्र शासनाकडून शक्य होती तेवढी मदत त्यांना करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था शासन तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्थलांतरितांविषयी काँग्रेसने राजकारण करू नये, जबाबदारीने बोलावे, अशी आपली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विनंती आहे, असे त्या शेवटी म्हणाल्या.