तुम्ही तुमच्या परदेशी असलेल्या मुलांशी बोलण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी आंतरराष्ट्रीय 'कॉन्फरन्स कॉल' करत असाल, तर सावधान! कारण महिन्याअखेर तुमच्या बिलाची रक्कम तुमची डोकेदुखी ठरू शकते. जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय 'कॉन्फरन्स कॉल'चे दर वाढवले असून, नागरिकांनी ही सेवा अधिक वापरल्यास त्यांना त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागू शकते. केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने याबाबत ग्राहकांना एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या पत्रकामध्ये आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स कॉल एका मर्यादेतच वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या जगभरात लॉकडाउन सुरू असल्याने भारतातील अनेक तरुण, विद्यार्थी, नोकरदार वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. भारतात वास्तव्यास असलेले त्यांचे पालक अनेकदा त्यांच्याशी कॉल्सद्वारे संवाद साधतात बऱ्याचदा नेटवर्क नसल्याने इंटरनेटऐवजी साध्या फोन कॉल्सचा वापर केला जातो. त्यातही एका पेक्षा अनेकांना बोलायचे झाल्यास 'कॉन्फरन्स कॉल' केला जातो. लॉकडाउनच्या काळात या कॉल्सची संख्या वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांकडून त्यांचे दर वाढवण्यात आले आहेत.
'कॉन्फरन्स कॉल' पडणार महागात; 'ट्राय'चा इशारा