पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजारात काही व्यापाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने दि पूना मचंटस् चेंबरने बाजार बंदचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी भुसार बाजार तातडीने सुरू करण्याचे आदेश व्यापाऱ्यांना दिले आहेत. ___ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद ठेवता कामा नये, अशा स्पष्ट सूचना गेल्या आठवड्यात दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चेंबरने बाजार बंदचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणखी दोन दिवस बाजार बंद ठेवण्यास परवानगी द्यावी. तसेच शनिवारी कार्यकारणीची बैठक घेऊन सोमवारपासून बाजार पुन्हा सुरू करू, अशी विनंती यावेळी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना केली. मागणी मान्य करत कोरोनाबाबत आवश्यक काळजी घेऊन २५ मे पासून भुसार बाजार पुन्हा सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
पुणे मार्केटयार्डाबाबत महत्त्वाचा निर्णय