मुंबईः विधान परिषदेच्या २१ मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जालना जिल्ह्यातील राजेश राठोड तर अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी अशा दोघांना उमेदवारी दिल्याने निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नऊ जागांसाठी आता दहा उमेदवार असतील. त्यामुळे कोणी माघार घेतली नाही, तर निवडणूक अटळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. मात्र काँग्रेसने दोन उमेदवार उभे केल्यामुळे निवडणूक अटळ आहे. उद्धव ठाकरेंनी या संबंधित मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही मराठी वृत्तवाहिनींनूसार काँग्रेस दोन जागा लढवण्यास ठाम राहिल्यास मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप देखील उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत शिवसेनेकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सहा उमेदवार असून यामध्ये दोन उमेदवार काँग्रेसचे आहे. एकत्र पद्धतीने निवडणूक लढलो तर अवघड नाही असं माझं मत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सहा उमेदवार कसे निवडणून आणायचे याबाबत नियोजन करत असल्याची माहिती देखील बाळासाहेब थोरात यांनी दिली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले होते. उमेदवारी मागे घेण्यास वाव आहे .त्यादृष्टीने काँग्रेसशी चर्चा करू. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्याची परिस्थिती आहे का हेही बघू मात्र आजच्या परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होणे सगळ्यांच्या हिताचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
का झाले उद्धव ठाकरे नाराज ? काँग्रेसच्या नेत्यांशी फोनवरून चर्चा