मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलिस दल अहोरात्र कार्यरत असल्यामुळे त्यांचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात रॅपिड ऍक्शन फोर्सच्या (आरएएफ) केवळ चार कंपन्या गुरुवारी केंद्राकडून पाठवण्यात आल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा (सीएएसएफ) भाग असलेल्या आरएएफच्या चार कंपन्या राज्यात दाखल झाल्या असून त्यात सुमारे ५०० जवानांचा समावेश आहे. त्यांना पुणे, औरंगाबाद, नाशिक व अमरावती सारख्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकायाने दिली. रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएएसएफ) २० कंपन्यांची मागणी करण्यात आल्याची माहिती नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. राज्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलिस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. सध्याची परिस्थिती पाहता रात्रंदिवस बंदोबस्त करून थकलेल्या राज्य पोलिसांच्या मदतीसाठी किमान दोन हजार सीएएसएफच्या जवानांची आवश्यकता आहे. थोडा आराम मिळाल्यानंतर नव्या दमाने पोलिस पुन्हा काम करू शकतील. सध्या मुंबई, मालेगाव, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद सारख्या शहरी पट्ट्यात केंद्रीय पथकाची आवश्यकता आहे. राज्य राखीव पोलिस दल सध्या स्थानिक पोलिसांना मदत करत आहेत.
रॅपिड ऍक्शन फोर्सच्या (आरएएफ) केवळ चार कंपन्या दाखल