निष्काळजी राहू नका

पुणे : औंध किंवा गावठाण परिसरात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु आता स्थानिक रुग्ण आढळल्याने या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संबंधित रुग्ण हा कोथरूडच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी पत्नीच्या उपचारासाठी गेला असता लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित रुग्णाची पत्नी निगेटिव्ह असून एकट्यालाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आला होता याची माहिती घेऊन संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. औंधमधील त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे व संबंधित सोसायटीत निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी सांगितले. २९ मार्च रोजी कोरोनाबाधीत झालेले बाणेर येथील पती पत्नी हे औंध प्रभागातील पहिले रुग्ण ठरले होते. परंतु यशस्वी उपचारानंतर ते दुरुस्त झाले होते यानंतर बरेच दिवस प्रभागात कोरोना रुग्ण आढळून आलेला नव्हता. औंध परिसरात एम्स रुग्णालयात इतर आजारामुळे दाखल झालेला एक रुग्ण काही दिवसांनी पॉजिटीव्ह आढळून आला होता परंतु तो स्थानिक नव्हता व त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यामुळे औंध भागातील एकही रुग्ण आजपर्यंत आढळून आला नव्हता. त्यानंतर २ मे रोजी बोपोडीत एक महिला आढळून आली होती परंतु तिच्यावरही यशस्वी उपचार सुरु आहेत.ग्रीन झोन असलेल्या औंधमध्ये आज सापडलेल्या रुग्णामुळे पुन्हा झोन बदलण्याची शक्यता आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असले तरीही नागरीकांनी विनाकारण बाहेर न फिरणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे याचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.