- राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी
पुणे प्रारंभीच्या काळात पुणे महानगर पालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका वगळता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी होता. लॉकडाऊन शिथील झाल्यावर मुंबई तसेच पर जिल्ह्यात गेलेले नागरिक ग्रामीण भागात परत आले, त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येवू लागला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यास सुरुवात केली. ___पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (२८ मे २०२० पर्यंत) एकूण रुग्ण २४१ तर बरे झालेले रुग्ण ९१ होते. एकूण क्रियाशील १४३ रुग्ण असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला. नगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्ण ६३ तर बरे झालेले रुग्ण ३१ होते. एकूण क्रियाशील रुग्ण ३० असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचा मृत्यूदर ३.२ टक्के तर पुणे ग्रामीणचा मृत्यूदर २.९ टक्के इतका आहे. पुणे ग्रामीण भागात एकूण कन्टेनमेंट झोन १०७ तर क्रियाशील कन्टेनमेंट झोन ७१ आहेत. यातील पूर्ण झालेले कन्टेनमेंट झोन ३६ आहेत. नगरपालिका क्षेत्रात एकूण कन्टेनमेंट झोन १२ तर क्रियाशील कन्टेनमेंट झोन ८ आहेत. यातील पूर्ण झालेले कन्टेनमेंट झोन ४ आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २४१ रुग्णांपैकी ९६ रुग्ण मुंबई येथून तर ७० रुग्ण पुण्यातून आलेले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील ६३ रुग्णांपैकी ४७ रुग्ण मुंबई येथून तर ४ रुग्ण पुण्यातून आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात इतर जिल्ह्यातून ५५ हजार ५४५ नागरिक परत आले आहेत. जिल्ह्यात १११ चेकपोस्ट असून त्यावर ९१२ कर्मचारी कार्यरत आहेत. ३९९० नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून ६७ हजार नागरिकांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या १३ तालुक्यात ३३ कोविड केअर सेंटर (सीसीसी) असून उपलब्ध खाटांची संख्या ३८८० इतकी आहे. कोविड रुग्णालये २१ असून उपलब्ध खाटांची संख्या ११८१ इतकी आहे. नजीकच्या काळात १८ कोविड केअर सेंटर आणि ४६८२ खाटा, २८ कोविड रुग्णालये आणि १८३० खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तात्पुरत्या कोविड रुग्णालयाची व्यवस्था करण्यात येत असून विप्रो हिंजेवाडी हॉस्पीटल येथे ४५० खाटांचे नियोजन आहे. हे हॉस्पीटल ३ जूनपासून कार्यरत होईल. मर्सिडीज म्हाळुगे इंगळे हॉस्पीटलमध्ये १४०८ खाटा असून सध्या ४० रुग्ण दाखल आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष (स्पेशल कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला असून तेथील टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४१३० असा असून एकूण १५ लाईन्स उपलब्ध आहेत. यावर आतापर्यंत २३ हजार ८३० नागरिकांनी कॉल करुन माहिती घेतली. शरद भोजन योजना, - जिल्हा परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निराधार ज्येष्ठ नागरिक, निराधार दिव्यांग नागरिकांना शरद भोजन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तयार जेवण थाळी दिवसातून दोन वेळा १०९४ निराधार ज्येष्ठ नागरिक आणि १९२ निराधार दिव्यांग नागरिकांना देण्यात येत आहे. ___ मजूर व्यवस्थापन - जिल्हा प्रशासनाचे एकूण ४० रिलीफ कम्प असून त्यामध्ये १२ हजार ३२२ स्थलांतरित कामगार आहेत. सुमारे १ लक्ष १७ हजार नागरिक ९१ ट्रेनमधून १४ राज्यांना रवाना करण्यात आलेत. १७ हजार ५१२ नागरिक इतर जिल्ह्यात व २३ हजार २४८ नागरिक विविध राज्यांमध्ये ३५९५ बसेसने पाठविण्यात आले. १६४७ विद्यार्थी इतर जिल्ह्यात व ५९८ विद्यार्थी विविध राज्यांमध्ये ११५ बसेसने पाठविण्यात आले. मनरेगा (महात्मा गांधी नरेगा) - गेल्या दीड महिन्यामध्ये मनरेगा कामांना जिल्ह्यात मोठया प्रमाणात चालना देण्यात आली. ग्रामपंचायत सहभाग १३ वरुन ५४४ पर्यंत वाढविण्ययात आला आहे. मजूर उपस्थिती १३१ वरुन ४०२८ पर्यंत गेली आहे. कामांच्या संख्येतही १७ वरुन १३९० पर्यंत वाढ झाली आहे.