या तळीरामांचे करायचे तरी काय ?

देशालाच नव्हे तर जगाला या कोरोनारूपी राक्षसाने हैराण करून सोडले आहे. त्याचाच मुकाबला करण्यासाठी देश पातळीवर प्रयत्न सुरू असून आख्खा भारतच यामुळे एक प्रकारे थांबला आहे. कोणीच बाहेर पडत नाही. जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत कारण सोशल डिस्टंन्सींग हाच एकमेव पर्याय देशासमोर असताना, तेच करण्याचे प्रयत्न देश पातळीवर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सुरक्षित अंतर राखण्याचे व घराबाहेर न पडल्याचे आवाहन करत आहे. हे करीत असताना देशातील डॉक्टर्स, सेवक, सफाई कामगार, पोलीस आणि प्रशासन यंत्रणा २४ तास कोरोनारूपी राक्षसाचा मुकाबला करण्यासाठी लढत आहेत. या कोरोना फायटर्सपैकी काहींना तर प्राणालाही मुकावे लागले आहे. त्यांचे बलीदान आपण कधीही विसरणार नाही. आमच्या पोलीस बांधवांपैकी अनेक जणांना या काळात घराबाहेरच जेवण करावे लागले आहे, अशी छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत.


या सगळ्यांच्या प्रयत्नांना एक प्रकारे हरताळ फासण्याचा प्रयत्न आज या तळीरामांमुळे झाला आहे. आपल्या गळ्याची तहान भागविण्यासाठी सोशल डिस्टंन्सींगचा एक प्रकारे त्यांनी फज्जाच उडविला आहे. सुशिक्षित पुणेकरांनी हम भी किसीसे कम नही असे म्हणत दारूच्या दकानांसमोर रांगा लावल्याचे व सोशल डिस्टंन्सींगचा बट्याबोळ केल्याचे दिसले. परंतु बोटावर मोजण्याइतपत काही ठिकाणे मात्र याला अपवाद ठरली. राज्याच्या उर्वरीत ठिकाणीही हीच अवस्था झाली. नाशिककरांना तर पुन्हा एकदा पोलीसांच्या काठीचा प्रसाद मिळाला. दारूमुळे महसूल मिळतो हे जरी खरे असले तरी अशाप्रकारे सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा उडवून व आमच्या कोरोना फायटर्सच्या प्रयत्नांना कोणी काळीमा फासण्याचा प्रयत्न करीत असेल तर हे त्वरीत थांबलेले बरे. अयशा याचे पनि तिगालाति-- परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाहीत. त्यावेळी पहात बसण्याशिवाय आपल्या हातात काहीच बसेल ?