औरंगाबाद : संपूर्ण जग कोरोना महामारीने एका महाभयंकर संकटात सापडले आहे. जसा या महामारीचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे, तसाच पत्रकारितेवरही झाला आहे. तेव्हा पत्रकारांनी सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे आणि धीर न सोडता आहे त्या परिस्थितीत आपले समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. संकटे येतात आणि जातात. अशा संकटात आपल्या माणसांना सांभाळणे, धीर देणे व शक्य होईल ती मदत संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मित्रांनो धीर सोडू नका, हे ही दिवस जातील, असा आशावाद महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी व्यक्त केला. कोरोनाचे संकट आणि पत्रकारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वसंतराव मुंडे महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्ह्यावार संवाद साधत आहेत. पत्रकार बांधव भलामोठा पगार नसतांनाही पत्रकारिता करत राष्ट्रीय सेवा करून कोरोना योद्धा म्हणून काम करित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पाँकेजमध्ये पत्रकारांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामूळे पत्रकारांसासाठी आर्थिक पॅकेज करिता शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. तसेच कोरोनाचे संकट लगेच संपणार नाही. तेव्हा पत्रकारांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेत बातमी संकलन करावे. धोक्यात येऊन कुठलेही कार्य करू नये. कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. याचे भान ठेऊन आरोग्य विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत लोकशाहीच्या चौथ्या शक्तीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. आपल्या सोबत काम करणाऱ्या बांधवांना सामाजिक दायित्व म्हणून संघटनेच्या माध्यमातून मदत देखील करावी, असे अवाहन त्यांनी सर्व पत्रकारांना केले. आपल्या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पत्रकारांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरुच आहे.
पत्रकारांनो धीर सोडू नका, हे ही दिवस जातील - वसंतराव मुंडे