'या' औषधाच्या वापराने ४ दिवसांत ६० रुग्णांनी दिली करोनाला मात

ढाका : करोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे औषध शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांमध्ये सध्या असलेल्या अॅण्टी व्हायरल व अन्य औषधांचा वापर करून करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. बांगलादेशमध्ये डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला चांगले यश मिळाले असून चार दिवसात ६० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ___ बांगलादेश मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. तारेख आलम यांनी दोन औषधांनी ६० करोनाबाधितांवर उपचार केले. करोनाची बाधा झालेले हे साठही रुग्ण चार दिवसात बरे झाले. डॉ. आलम यांनी डोव्हिसिक्लिन या अँटीबायोटिकच्या एका डोसमध्ये इव्हर्मेक्टिन नावाचे अँटीप्रोटोझोल औषधाचे मिश्रण करत उपचार केले. या रुग्णांमध्ये कोणतेही साइड इफेक्ट्स दिसले नसल्याचे माहिती रुग्णालयाने दिली आहे. करोनबाधितांवरील या औषधांच्या वापराबाबत आम्ही आशावादी असल्याचे डॉ. आलम यांनी सांगितले. लवकरच आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत या उपचाराबाबत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.