जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर

पुणे शहर, पुणे छावणी आणि खडकी छावणी परिसर रेड झोनमध्ये तर पिंपरी चिंचवड शहर, देहरोड छावणी परिसर आणि सर्व तालुक्यांचा भाग नॉन रेडझोनमध्ये ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून ही सोय करण्यात आली असून यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले असून काहींची कठोरपणे अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (गुरुवारी) रात्री काढले आहेत. याची अंमलबजावणी २२ ते ३१ मे २०२० या कालावधीत होणार आहे. पुणे जिल्ह्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्र, पुणे छावणी, खडकी छावणी हे रेडझोनमध्ये आले आहे. छावणी परिसरातील सर्व उपक्रम आणि कृतींना शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका, देहरोड छावणी परिषद क्षेत्र आणि रेडझोनमध्ये येणारे क्षेत्र वगळता अन्य सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींचा भाग नॉन रेडझोनमध्ये येणार आहे. मावळ तालुक्यातील माळवाडी, तळेगाव शहरातील वॉर्ड क्रमांक दोन परिसर, अहिरवडे, वेहेरगाव, दहिवली, चांदखेड हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा नॉन रेडझोनमध्ये समावेश असल्याने शहरातील सर्व उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, विमान, रेल्वे सेवा, बस, मेट्रो, (वैद्यकीय, सुरक्षा कारणास्तव तसेच केंद्र सरकारने परवानगी दिलेली वगळून) बंद राहील. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, उज्ञान, सभागृह आदी बंद राहील. सर्व प्रकारच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी राहील. प्रतिबंधित क्षेत्र सील केले जाईल. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू राहील. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर एखादा रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत आणि परिसर तात्काळ सील करण्यात येणार आहे. सर्व शासकीय कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सुरू प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागातील खासगी कार्यालये सुरू औद्योगिक आस्थापना आणि कार्यालये, माध्यमांची कार्यालये, केबल सर्व्हिस आर्थिक आस्थापना (बँका, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्यांची कार्यालये) ई कॉमर्स, कुरिअर, पोस्ट ऑफिस, कार (चालक आणि दोन प्रवासी), तीनचाकी (चालक आणि दोन प्रवासी), दचाकी (फक्त चालक) यांना परवानगी खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणारी उपहारगृहे आणि स्वयंपाकगृहे सुरू राहतील बांधकामाची कामे सशर्त सुरू खासगी सुरक्षा व्यवस्था प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील दुकाने सकाळी नऊ ते दुपारी पाच या वेळेत सुरू राहतील स्टेडियम व क्रीडा संकुल वैयक्तिक व्यायामासाठी खुली दुय्यम निबंधक कार्यालये, प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सुरू प्रतिबंधित क्षेत्र नसलेल्या ठिकाणची शेतीची कामे सुरू सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळता सर्व हालचालींवर प्रतिबंध.