विधान परिषदेची निवडणुक बिनविरोधच होणार - संजय राऊत

मुंबई : संख्याबळ नसतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. करोनाच्या संकटकाळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील असताना काँग्रेसनं परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेसनं हट्ट न सोडल्यास निवडणूक लढवायचीच नाही, या निर्णयाप्रत ते आल्याचं समजतं. प्रत्येक पक्षानं संख्याबळानुसार उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. महाराष्ट्र करोनाचा सामना करत असताना तसं होणं औचित्यपूर्ण ठरेल. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांचीही तीच इच्छा आहे. मात्र, काँग्रेस दोन जागा लढण्यावर अडून बसल्यानं उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याचं समजतं. त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिल्याचं सूत्रांकडून समजतं. 'अनेक लोक रस्त्यावर आहेत. काही घरात बंद आहेत. आरोग्याबरोबरच पोटाचा प्रश्न आहे. अशावेळी सर्व राजकीय पक्ष एकमतानं निवडणूक घेऊ शकत नाहीत हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं चित्र नाही. उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारच्या राजकारणात कधीच रस नव्हता आणि नाही. ते या सर्व प्रकारामुळं अस्वस्थ आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली तरच लढावी अशी त्यांची इच्छा आहे,' असं राऊत म्हणाले.