*कोरोनाच्या लसीबाबत का होतेय हेळसांड? *

(शासनाकडून ही लस बनविण्याचे प्रयत्न होत नाहीत असे आम्हास म्हणावयाचे नाही. परंतु प्रगत असा अमेरिका देश जर फक्त सोशल मिडीयावर आलेल्या वृत्ताच्या पडताळणीसाठी एवढ्या दुरून दोनवेळा संपर्क साधत असेल तर आपल्या आरोग्य विभागाने याची साधी पडताळणीही करू नये, ही बाब खटकणारी वाटते. कारण आपल्याच देशाने आयुर्वेदाचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे. त्या देशात आयुर्वेदाकडे दुर्लक्ष होते आहे असेच वाटते. )


अहमदनगर येथील बबन शिंदे तसेच ठाणे येथील येथील खांबे यांनी कोरोनासाठी उपयुक्त लस शोधून काढली आहेत. त्यांच्या दाव्याप्रमाणे या लसीची तपासणी करून जर योग्य असेल तर रूग्णांना देण्यास सुरू करावी अशा स्वरूपाच्या मागणीची या संकटकाळातही दखल घेतली जात नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. याची दखल न घेता उलट त्यांना सरकारी काम आणि ६ महिने थांब अशा स्वरूपाचा अनुभव येत आहे. सरकारी मान्यतेसाठी त्यांना कार्यालयांच्या खेपा मारण्यास सांगितले जात आहे. गुरूवार दि. २८ मे २०२० रोजी याबाबत कोव्हिडचे प्रमुखांबरोबर बैठक असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले तसे वृत्तही प्रकाशित झाले. परंतु गुरूवारी काहीच हालचाल न दिसल्याने माध्यम प्रतिनिधींनी कोव्हिडचे प्रमुख डॉ. लहाणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अशी कोणती बैठक माझ्या कार्यालयात आयोजित केल्याचे निदान मला तरी माहित नाही ? असेच उत्तर दिले. प्रमुखानेच हे उत्तर दिल्यावर सरकारी यंत्रणा नक्की काय करते याचीच झलक येथे पहावयास मिळत आहे. त्यानंतर पुन्हा आज माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर तशी काही मान्यता देण्याची परवानगी मला नसून हे काम एफडीए करीत आहे असा फुकटचा सल्लाही देऊन टाकला. ___मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना बबन शिंदे व खांबे यांच्या लसींची साधी पडताळणीही करण्यास किंवा त्यासंदर्भातील आलेला मेलही जर कोणी पहात नसेल तर यासारखे आपले दुसरे दर्दैव नाही असेच म्हणावेसे वाटते. या लसीच्या रूपाने आशेचा किरण दिसत असेल तर त्यासंदर्भात काय करता येईल. याचा उलट टपाली मेल बबन शिंदे यांना गेलाच पाहिजे होता, नव्हे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोव्हिड कार्यालयात बोलावून याची माहिती घेणे आवश्यक होते किंवा काही शासकीय कर्मचारी या कामासाठी लावून या लसींची तपासणी करणे गरजेचे होते. चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता जर तुमच्यामध्ये नसेल तर हे असेच होणार. रोज या भागातील आकडे वाढले, तिकडे मृतांची संख्या वाढली अशा स्वरूपाच्या बातम्या ऐकायला मिळणार, यात काही शंकाच नाही... ___ कोरोना या संकटाचा सामना सर्वच जण आपल्या पद्धतीने करीत आहेत. पोलीस त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत तर डॉक्टर व नर्सेसही आपली सेवा बजावीत आहेत तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला वाटा उचलला आहे. मृत्युचा आकडा वाढत आसताना सर्व नियम, आदेश आणी कायदे, नियम बाजुला ठेवून तात्काळ टास्क फोर्स, आरोग्य खाते आणी तज्ज्ञ मंडळ, संशोधक, आरोग्य खात्यातील वरिष्ठ यांनी या औषधांचा वापर रुग्ण आणी कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी तात्काळ करता येईल यासाठी चाचण्या, कायदेशीर आणी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ते तपासणीचे सोपस्कर तरी पुर्ण करावेत. अमेरिका सारखा प्रगत देश फक्त सोशल मिडीयाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील नगर येथे बबन शिंदे यांच्याशी एकदा नव्हे दोनदा लसीबाबत संपर्क साधत असेल तर आपल्या आरोग्य विभागाबाबत काय म्हणावे. आयुर्वेदिक औषध फुकट देण्याची तयारी या दोघांचीही आहे पण म्हणतात ना पिकते तिथं विकत नाही अन फुकटची किंमत विकत दिल्याशिवाय कळत नाही तशी काहीशी परिस्थिती आपली झाली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यासह देशात असे अनेक आयुर्वेदिक औषध तयार करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र कमिटी एकाच ठिकाणी सर्व चाचण्या आणि परवानगी देण्याची व्यवस्था केली तर यावर औषध शोधले जाऊ शकते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारतात एवढे आयुर्वेद ज्ञान, एवढे तज्ञ तसेच मोठमोठे आयुर्वेदीक ग्रंथ असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, यास काय म्हणावे. यातून हे नक्की स्पष्ट होते की आपलाच आपल्यावर विश्वास नाही.