आम्हालाही सॉफ्टलोनची सुविधा द्यावी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पर्यटन, हॉटेल आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज लोकांनी सांगितले की, सरकारच्या पॅकेजमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू झाल्या पण पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. काही हॉटेल्सना होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. मल्टीप्लेक्स, चित्रपटगृह अद्याप बंदच आहेत. सलून आणि वेलनेस सेंटर देखील बंद आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे कामकाच ठप्प आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या टूर आणि ट्रॅव्हल्स संबंधित कंपन्यांची अवस्था प्रचंड खराब आहे. सरकारने काही प्रमाणात मदत केली पाहिजे असे ते म्हणाले. पर्यटन क्षेत्राला मदत केली नाही तर लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील असे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे म्हणणे आहे.