लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा व बडेजाव रोखण्यासाठी कीर्तनकार व प्रवचनकारांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र, यंदाच्या लग्नसराईत कोरोनामुळे ही गोष्ट सहज साध्य झाली आहे. अनेक पूर्वनियोजित विवाह घरगुती व अगदी साध्या पद्धतीने पार पडत आहेत. ग्रामीण भागात शेतातून मंगल कार्यालयात गेलेले विवाह पुन्हा शेतात व मंदिरात होऊ लागले आहेत. कोणताही बडेजाव नाही व थाटमाट नाही. खर्चाची उधळपट्टी नाही व सत्कार समारंभही नाहीत, अशा पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या विवाह सोहळ्यांमुळे सर्वसामान्य कुटुंबे सुखावली आहेत. पूर्वी आठ-आठ दिवस चालणारे लग्नविधी नंतर एक-दोन दिवसांवर आले. परंतु त्यात अनिष्ट प्रथांचा शिरकाव झाला. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवसाय तेजीत आल्यापासून या प्रथांना बळ मिळाले. लग्नपत्रिकांमधील नावांची तर काहींनी पुस्तकेही छापली. कुंकुमतिलक समारंभ, हटके हळदी समारंभ, लाखो रुपये खर्चाचे डेकोरेशन, मिरवणूक, पंचपक्वान्नाच्या जेवणावळी, वरात आदी बाबींवर होणारा खर्च, डिजेच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, राजेशाही थाटातील मिरवणुकांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, लांबलेली मिरवणूक यामुळे लग्नसोहळे यांना वर्तमानपत्रातही स्थान मिळाले. काहींनी जमिनी विकून तर काहींनी कर्जबाजारी होऊन असे लग्न पार पाडल्याचीही उदाहरणे आहेत. बडेजाव तसेच अनावश्यक व चुकीच्या प्रथा बंद करण्याचा ठराव त्यांनी केला. परंतु प्रस्थापित घराण्यांनी पुढाकार न घेतल्याने सर्व ठराव कागदावर राहिले. अखेर कीर्तनकार व प्रवचनकारांनीही हात टेकले. ___ परंतु कोरोनोच्या या संकटामुळे हे शक्य झाले आहे. यामुळे मंदिरात अथवा शेतातही अत्यंत छोटेखानी विवाहास सुरूवात झाली आहे. कोणताही सत्कार न करता कमी वेळात विवाह सोहळा संपन्न होत आहे. बडेजास दाखवण्याच्या स्पर्धेत काहींना जमिनी विकाव्या लागल्या तर काहींना कर्जबाजारी व्हावे लागले.
कोरोनाने रोखला विवाहातील अनावश्यक गाजावाजा