अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण

नवी दिल्ली - सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.