कोरोनाने केला दाऊदचा खात्मा - वृत्त व्हायरल

कराची : १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या डी कंपनीचा म्होरक्या दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर दाऊदवर पाकिस्तानमधील कराचीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून ती देखील याच रुग्णालयात असल्याचे बोलले जात होते. आता दाऊदचा मृत्यू झाला अशी चर्चा रंगत आहे. पाकिस्तानकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त त्याचा भाऊ अनीस इब्राहिमने फेटाळून लावले आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमने एका अज्ञात स्थळावरुन फोन करत दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. दाऊदसह त्याच्या कुटुंबियातील कोणत्याही सदस्यांला कोरोनाची लागण झालेली नाही, अशी माहिती अनीस इब्राहिमने दिली आहे. यूएईमधील पंचतारांकित हॉटेल्स, पाकिस्तानमधील मोठमोठे बांधकाम प्रकल्प आणि ट्रान्सपोर्ट सेवेचा डी कंपनीची प्रमुख जबाबदारी अनीस इब्राहिम पाहतो.