राज्य सरकारचा आदेश जारी

पुणे : महाविकास आघाडीने सरकारने सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज यासह अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करणारा आदेश आज लागू केला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तो जाहीर केला. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०२०-२१ पासून लागू होणार आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी मराठा भाषा विषय शिकविला जात नाही, येथे पहिली व सहावीपासून हा विषय यंदापासून हा विषय सक्तीचा होणार आहे. नंतर पुढील वर्षी दुसरी व सातवी, त्यानंतर तिसरी व आठवी असे टप्पे गाठण्यात येतील. दहावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा राहणार आहे. यासाठीची पुस्तके बालभारती तयार करणार आहे.कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करताना त्यासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली नाही. यासाठीच्या सोयी निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर टाकण्यात आलेली आहे. परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सवलत अथवा मराठी या विषयातून पूर्णतः सूट देण्याचा अधिकारही शाळांना देण्यात आलेला आहे.