उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेचा निर्णय

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता उत्पन्न वाढविण्यासाठी सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला साधारण २०० कोटी उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना दिली. कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या तिजोरीत प्रचंड खडखडाट आहे. पुणे महापालिकेच्या तब्बल १० हजार सदनिका आहेत. मालमत्ता विभागाकडे ३ हजार सदनिका आहेत. त्यातील १५०० सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला सुमारे २०० कोटी रुपये उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत या सदनिका पडून ठेवायच्या नाहीत. भाड्याने द्यायच्या नाहीत. त्याचा थेट लिलावच करणार असल्याचे रासने यांनी सांगितले. पुणे महापालिकेचे २०२०-२१ चे बजेट ७ हजार ३९० कोटींचे आहे. कोरोनाचा संकट काळात मागील अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही पुणेकरांनी मिळकत कराचे ऑनलाईन ३५० कोटी रुपये जमा केले आहे. ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे आयुक्तांनी २ महिन्यांत लगेच पुरवणी बजेट मंजूर करणे बरोबर नाही. आगामी काळातही महापालिकेचे उत्पन्न वाढू शकते, असा रासने यांना विश्वास आहे.