पुन्हा एकदा कटिंगसाठी दरवाढ

नागपूर : राज्यात दाढी आणि कटिंगचे दर वाढून महिनाही होत नाही तोच पुन्हा एकदा कटिंग आणि हेअर डायचे दर वाढले आहेत. रविवारपासून ग्राहकांना कटिंगसाठी १०० रुपयांऐवजी १५० रुपये तर हेअर डायसाठी १०० रुपयांऐवजी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या रविवारपासून राज्यातील सर्व सलून सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. दरम्यान, परवा रविवारपासून राज्यभरातील सलून सुरू होत आहेत. तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू होणार आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. तरीही सलून चालकांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारने अटी आणि शर्तीवर रविवारपासून सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असले तरी दुकानाचे भाडे, वीजबिल, कारागिरांचे वेतन यामुळे सलूनचालक कर्जबाजारी झाला आहे. आता सलून सुरू होणार असल्याने दुकानासह सलूनमधील सामानाचे निर्जंतुकीकरण, फेस मास्क, पीपीई किट, हातमोजे यांचा वाढीव खर्च मागे लागणार आहे. सुरक्षित वावर जोपासण्याचे बंधन राहणार असल्याने दिवसभरात कमी गि-हाईक होणार असल्याने उत्पन्न घटणार आहे. त्यामुळेच दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.