पुणे : महावितरणकडे मनुष्यबळ किंवा साहित्याची कोणतीही कमतरता नाही. दुरुस्ती खर्च व साहित्य खरेदीसाठी स्थानिक अधिकार दिले आहेत. त्यामुळे 'निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पुणे जिल्ह्याच्या दुर्गम अतिदुर्गम भागातील शेवटच्या घराचा वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचा जलद वेग कायम ठेवा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले. ____ 'निसर्ग' चक्रीवादळाचा वीजयंत्रणेला तडाखा बसल्यानंतर वीजपुरवठ्याची स्थिती आणि दुरुस्तीच्या कामांबाबत शनिवारी (दि. ६) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी पुणे, कोकण, नाशिक, कल्याण, भांडूप परिमंडलांचा आढावा घेतला. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी चक्रीवादळाच्या तडाख्याने बाधीत झालेली वीजयंत्रणा, दुरुस्ती मोहीम व वीजपुरवठ्याची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. __ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या संकट काळातच चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उपाययोजना करून चक्रीवादळाच्या बाधीत भागामध्ये अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे. सध्या उपलब्ध असलेले सर्व साहित्य या वादळग्रस्त भागासाठी वापरण्यात यावे. दुरुस्ती खर्च किंवा साहित्य खरेदीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास पेडींग ऑर्डरची जलद पूर्तता करून साहित्य उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच चक्रीवादळामुळे नादुरुस्त झालेली वीजयंत्रणा व दुरुस्तीनंतर पूर्ववत झालेल्या वीजपुरवठ्याची दैनंदिन स्थिती याबाबत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. अजित पवार यांना तसेच संबंधीत खासदार व आमदार यांना सुद्धा अवगत करण्यात यावे, असे आदेश ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी दिले.
शेवटच्या घराचा वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत दुरुस्तीचा वेग कायम ठेवा - उर्जामंत्री