मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी मालकाने बुक केली चक्क विमानाची तिकीट

हैदराबाद : लॉकडाऊन उघडल्यानंतर श्रमिक आपापल्या कामावर परतण्याची शक्यता आहे. परंतु, अनेक श्रमिक असेही आहेत ज्यांचा आता शहरावर विश्वास उरलेला नाही. संकटकाळात वाऱ्यावर सोडून देणाऱ्या शहरांत आता परत जायचं नाही, असा अनेकांनी निश्चय केला आहे. अशा वेळी हैदाराबादच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत कामावर बोलावण्यासाठी त्यांच्या मालकानं चक्क विमानाची तिकीटं बुक करून श्रमिकांना धाडली आहेत. या बिल्डरनं उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या मजुरांना परत कामावर हजर होण्यासाठी ही सोय केली आहे. या बिल्डरनं मजुरांना विमान प्रवासाची आशा दाखवत परत बोलावलं आहे. प्रत्येक तिकीटासाठी त्यानं ४००० - ५००० रुपये खर्च केले आहेत. या साईटवर काम करणारे मजूर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू तसंच पश्चिम बंगालमधून इथं दाखल होणार आहेत.