* कोरोनाचे फटके *

रेडिमेड कपडे विकणाऱ्या व्यावसायिकांची चिंता वाढली


औरंगाबाद : कोरोना विषाणुने माणसाची लाईफस्टाईल बदलली आहे. अनेक व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वाधिक परिणाम रेडीमेड कपड्यांवर होणार आहे. रेडीमेड कपडे ट्राय केल्याशिवाय घेता येत नाही. यापुढे रेडीमेड कपडे ट्राय करताच येणार नाही. नो ट्रायल, नो एक्सेंज ही पद्धत अवलंबावी लागणार असल्याने व्यवसाय संपून पुन्हा कपडे शिलाई करण्याकडे कल वाढु शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यामुळे रेडीमेड दुकानदार मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. तयार कपडे फिटिंगनुसार चॉईस केले जातात, त्यामुळेच दुकानात ट्रायल रूम ही अनिवार्य असते. कुठलाही ड्रेस ट्राय करून पहा, अशी सहज प्रतिक्रीया दुकानात ऐकु येत असते, दुकानदारही ड्रेस ट्राय करून बघा असेच सांगत असतो. एक ड्रेस खरेदी करताना चार-पाच ड्रेस घालून बघितले जातात त्यानंतरच ड्रेस निवडला जातो, प्रत्येक तयार कपड्यांच्या बाबतीत असेच आहे. असे असले तरीही यापुढे मात्र हा प्रकार बंद करावाच लागणार आहे. त्यामुळे ग्राहक तुटणार आणि व्यवसायाला फटका बसणार अशी भिती रेडीमेड दुकानदार व्यक्त करत आहेत.