मुंबई: माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचा मुंबई आणि नांदेडमध्ये प्रवास सुरू होता. राज्य सरकारच्या अनेक बैठकांना ते उपस्थित राहत होते. तसंच, त्यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्येही परिस्थितीची पाहणी करत होते. करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा चव्हाण नांदेडमध्ये होते. त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, रुग्णालयात असतानाही ते कार्यरत होते. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांनी आपली मतंही मांडली होती. चव्हाण यांच्याप्रमाणेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून पुन्हा काम सुरू केले आहे.
अशोक चव्हाण यांची करोनावर मात