शहरात पाच भागांत कोरोना रुग्णांची संख्या कमी तर पेठांमध्ये अधिक

पुणे - कोरोनाचे शहरातील सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारित म्हणजे ३२५ तर, सर्वात कमी ३ रुग्ण कोथरूड- बावधन परिसरात आहे. पुण्यातील ९० टक्के रुग्ण महापालिकेच्या १५ पैकी भवानी पेठ, ढोल पाटील रोड, घोले रोड, येरवडा आणि कसबा पाच क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारित आहेत. दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाने थैमान घातले आहे. पाच क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारित सुमारे ७१ हजार कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख आहे. या कुटुंबांपैकी किमान २० हजार कुटुंबांनी स्थलांतर करावे, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. परंतु, त्यास अद्याप यश आलेले नाही. त्यातच गेले दोन दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे स्थलांतर सध्या शक्य होणार नाही, असा अंदाज महापालिकेतील अधिकाऱ्यांनी वर्तविला. या ७१ हजार कुटुंबांपर्यंत शिधा पोचविण्याची महापालिकेने तयारी केली आहे. त्यांना किमान पंधरा दिवस पुरेल, एवढा शिधा देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.