* देरसे आए दुरूस्त आए..... *

करोना रुग्णांना होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधोपचारासाठी आता शासन मान्यतेची मोहर !


मुंबई : जगभरात निर्माण झालेल्या करोना वादळावर मात करणारे औषध वा लस तयार करण्यात जगभरातील शेकडो संशोधक व संस्था अहोरात्र संशोधनात व्यस्त आहेत. लाखो लोकांचे बळी घेणाऱ्या या करोना विषाणूचा सामना करणारे ठोस औषध वा लस अजून तरी आधुनिक वैद्यकांच्या हाती लागलेले नसताना करोनाचा संभावित वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आता प्राचीन आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी औषधांचा वापर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करण्याच्या प्रस्तावावर मान्यतेची मोहर उमटवली आहे. ___ या पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी करोना रुग्णांवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी जोरात लावून धरली. यातील बहुतेक डॉक्टरांचे म्हणणे होते आमच्या औषधांचा फायदा रुग्णाना किंवा संभाव्य रुग्णामधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत करतो. तसेच कोणतेही साईड इफेक्ट या औषधांना नसल्याने ती देण्यात यावी. 'आयुष' नेही करोना रुग्णांना होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे द्यावी, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. करोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. डॉ. तात्याराव लहाने यांच्या समितीने करोना रुग्ण तसेच संभाव्य रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने होमिओपॅथी व आयुर्वेदिक तसेच युनानी औषधे देता येतील असे आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच यातून करोना रुग्णांना बरे करतो असा कोणताही दावा केला जाणार नाही हेही स्पष्ट केले आहे.